‘मला तेवढाच उद्योग नाहीय’, पार्थ यांच्या ट्विटवर अजित पवारांनी सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यानंतर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. हाथरसमधील रेप आणि आणि राहुल गांधींना झालेली अटक यावरही त्यांनी भाष्य केलं. परंतु पार्थ पवार यांच्या मराठा आरक्षणावरील ट्विटबद्दल छेडलं असता त्यांनी मला तेवढाच उद्योग नाहीये असं म्हणत संताप व्यक्त केला.

अजित पवार म्हणाले, “सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका नाही. आता अलीकडची मुलं काय काय ट्विट करतात. प्रत्येक वेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलानं हे ट्विट केलं, तुमच्या मुलानं ते ट्विट केलं. मला तेवढाच उद्योग नाहीये. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकानं काय ट्विट करायचं हा ज्याला त्याला आपला न्याय हक्क मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे” असंही अजित पवार म्हणाले.

हाथरथ रेप केसवर बोलताना अजित पवार म्हणाले, “उत्तर प्रदेशच्या हाथरथमध्ये जे काही घडलं ते वाईट होतं. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरीही अशा घटना घडता कामा नये. केंद्र सरकारनं त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे जेणेकरून कोणी असं करताना दहा वेळी विचार करेल.”

राहुल गांधींच्या अटकेवर बोलतान अजित पवार म्हणाले, “राहुल गांधी यांच्या जाण्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता असं नही. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना पीडीतेच्या कुटुंबाला भेटू दिलं पाहिजे. कारण संसद असेल किंवा विधानसभा तो विषय मांडण्यासाठी वस्तुस्थिती समजून घेण्याची गरज असते.”