…तर धर्मेंद्र यांनी सनीला लोकसभा लढवू दिली नसती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सनी देओल पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवत आहे. काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांच्या विरोधात ते निवडणूक लढवत आहे. यावर अभिनेते आणि सनी देओलचे वडील धर्मेंद्र यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बलराम जाखड हे माझ्या भावासारखे आहेत,

जर मला माहिती असते की त्यांचा मुलगा सुनील जाखड गुरूदासपुरमधुन निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात मी सनीला निवडणूक लढवण्यास परवानगी दिली नसती,असे विधान आज त्यांनी केले आहे.

पुढे बोलताना धर्मेंद्र म्हणाले कि, सुनील जाखड हे माझ्या मुलासारखे आहेत. त्यांचे वडील बलराम जाखड यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. सनी त्यांच्याशी वाद घालू शकत नाही. आम्ही राजकारणातील माणसे नाही,आम्ही चित्रपटाशी संबंधित माणसे आहोत. आम्ही त्यांच्याशी वाद घालू शकत नाही. मुलाच्या पहिल्या रोड शो मध्ये त्याला पाठिंबा देणा-यांची अलोट गर्दी पाहिल्यानंतर आपण भावुक झालो होतो,असेही धर्मेंद्र यावेळी म्हणाले .

दरम्यान, सुनील जाखड हे गुरदासपुरचे विद्यमान खासदार आहेत. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणूकीत २०१७ मध्ये ते विजयी झाले होते. ही जागा भाजपाचा गढ राहिलेली आहे. विनोद खन्ना १९९८ मध्ये पहिल्यांदा याठिकाणी विजयी झाले होते.