शरद पवारांचं बाबरी मशीदीबाबत मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अयोध्येतील बाबरी मशीद कारसेवकांनी पाडली होती. ही घटना देशातील वादग्रस्त घटना म्हणून ओळखली जाते. बाबरी मशिदीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे विधान केले असून, शरद पवार हे त्याकाळी संरक्षण मंत्री होते. राम मंदिरासाठी चाललेले आंदोलन उग्र असताना गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दिलेल्या सल्ल्यावर पंतप्रधान नरसिंह राव यांनी विचार केला असता तर बाबरी मशीद पडलीच नसती असे विधान शरद पवार यांनी केले आहे. शंकरराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, राजारामबापू पाटील आणि रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

रामजन्मभूमीच्या आंदोलनामुळे परिस्थिती गंभीर झाली होती, तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंह यांचे सरकार होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान नरसिंहराव यांनी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली त्यामध्ये शंकरराव चव्हाण, अर्जुनसिंह, माधवसिंह सोळंकी आणि शरद पवार यांचा समावेश होता. गृहसचिव माधव गोडबोले यांनी सादर केलेल्या अहवालानुसार अयोध्येत काहीतरी विपरीत घटना घडण्याची शक्यता वर्तविली होती. या अहवालावर चर्चा झाल्यानंतर गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी कल्याण सिंह सरकार बरखास्त करण्यात यावे असे मत मांडले. शंकरराव चव्हाण हे आपल्या भूमिकेवर ठाम होते परंतु, पंतप्रधान नरसिंहराव आणि समितीमधील इतर सदस्यांनी या भूमिकेला विरोध केला होता.

कल्याण सिंह सरकार बरखास्त केले नाही तर बाबरी मशीद देखील राहणार नाही. अशी भीती चव्हाण यांनी व्यक्त केली तरीही पंतप्रधान नरसिंहराव यांनी त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली आणि त्यानंतर संपूर्ण देशात त्या जागेवर राम मंदिर उभारावे अशी मागणी जोर धरू लागली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होते. सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जमिनीवर एकेकाळी राममंदिर असल्याचे मान्य केल्याने त्या जागी राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला. मंदिर स्थापनेसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली असून, लवकरच मंदिराचे भूमिपूजनही होणार आहे.