Loksabha : ‘या’ उमेदवाराचा पराभव झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील महाडिक गटाचे राजकारण संपेल

महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली भीती

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा जर पराभव झाला तर जिल्ह्यात महाडिक गटाचे राजकारण संपेल अशी भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी करवीर तालुक्यातील खुपिरे येथे ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना मांडल्या.

लोकसभेत पुतण्याचा पराभव झाला तर कोल्हापूर जिल्हा दूध संघाची(गोकूळ) सत्ताही जाईल असं भाकितही आमदार महादेवराव महाडिक यांनी केलं आहे. चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्याविरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने निवडणुका अजून महिनाभर लांब आहे अशातच महाडिक गटाचे नेते आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी ही भीती व्यक्त केली आहे.

गोकूळच्या विशेष सभेत शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी पोलिसाचे कडे तोडून मुख्य सभामंडपात धडक दिली होती याचाही महाडिक यांनी राग व्यक्त केल्याचे दिसून आले. याबाबत बोलताना महाडिक म्हणाले की, “चंद्रदीप ज्या पद्धतीने सभेला नाचत आला तसाच त्याचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रचारारत आमदार नरके यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी प्रचारात जोरदार पुढाकार घेतला आहे. यावरूनही महाडिक यांचा संताप अनावर झाल्याचे दिसत आहे.