‘घटनादुरुस्ती ऐवजी ‘बदल’ हा शब्द निघाला असेल, याबद्दल खेद व्यक्त करतो’ : खा. संभाजीराजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षणावरून राज्यभरात वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विविध ठिकाणी आंदोलने आणि विरोध प्रदर्शने देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांनी या आरक्षणात गरज पडल्यास मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडेही मदत मागण्याची तयारी दर्शवली आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी, केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल, उदा- घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरू आहे, असे संभाजीराजेंनी म्हटल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते. त्यानंतर अनेकांनी या वक्तव्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता माझ्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे. त्याचबरोबर मला घटनादुरुस्ती असे म्हणायचे होते, असे देखील त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे .याचबरोबर काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकारण तापले होते.

सुप्रिम कोर्टाने आरक्षणाला स्थागिती दिल्यानंतर राज्यभरात सरकारविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे देखील या आंदोलनात आघाडीवर आहेत. सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. मराठा आरक्षणासहविविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असून यामध्ये आज खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी संभाजीराजेंनी सरकारला इशारा देत थेट तलवार काढण्याची भाषा केली होती. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, अशा शब्दांत संभाजीराजेंनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. आता, गरज पडल्यास केंद्र सरकारच्या मुव्हमेंटने घटना बदल करण्याच्या दृष्टीने माझा अभ्यास सुरू असल्याचं संभाजीराजेंनी म्हटंल होतं. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पाहणीसाठी गेले असताना, पत्रकारांनी मराठा आरक्षणासंदर्भात संभाजीराजेंना प्रश्न विचारले होते. मात्र, मला तसं म्हणायचं नव्हत, असे स्पष्टीकरण संभाजीराजेंनी दिलं आहे.

संभाजीराजेंचे स्पष्टीकरण
माध्यमांमध्ये या बातम्या आल्यावर आणि त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.संभाजीराजेंनी यावर स्पष्टीकरण देताना ,मला माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा बातम्या दिसत आहेत, मराठा आरक्षणासाठी वेळप्रसंगी घटना दुरुस्ती करण्यासंबंधी अभ्यास करणार आहे, मला हे वाक्य बोलायचे होते. चुकून बोलण्याच्या ओघात, घटना दुरुस्ती ऐवजी बदला हा शब्द निघाला असावा, पत्रकारांनी भावना समजून न घेता, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावल्या. त्यामुळे, लोकांच्या भावना दुखावल्या, त्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.

काय म्हणाले होते संभाजीराजे
काल संभाजीराजेंनी मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसईबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे, त्यामुळे ते सिद्ध झालं आहे. विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे. तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु असल्याचे त्यांनी म्हटले होते.