Coronavirus : बहिण-भावाची अचानक प्रकृती बिघडली, उल्टी झाल्यानंतर जीव सोडला, 19 जण क्वारंटाईन

इंदूर : वृत्तसंस्था – शहरापासून ३० किमी अंतरावर असलेल्या राघवगड गावात दोन मुलांचा रहस्यमय मृत्यू झाला असून दोन्ही मुलांच्या मृत्यूमध्ये २४ तासांपेक्षा कमी अंतराचा कालावधी होता. प्रथम दोन्ही मुलांची तब्येत बिघडली, नंतर उलट्या झाल्या. नंतर रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच या मुलांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे वय अडीच वर्षे व मुलगी अवघ्या ११ महिन्याची होती. कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह पुरला असून मुलाचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहस्यमय मृत्यूची घटना राघवगड गावात पहारेकरी म्हणून काम करणारा इब्राहिम पठाण याच्या घरातील आहे. इब्राहिम पठाणचा मधला मुलगा शाहिदला दोन मुले होती. पहिला मुलगा अडीच वर्षाचा होता तर दुसरे मुलं ११ महिन्यांचे होते. मंगळवारी सकाळी शाहिदच्या मुलीची तब्येत अचानक बिघडली आणि उलट्या होऊ लागल्या. शाहिद मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिने जीव सोडला. त्यानंतर शाहिदच्या कुटुंबीयांनी मुलीचा मृतदेह स्थानिक कब्रिस्तान मध्ये पुरला.

बहिणीच्या मृत्यूनंतर २४ तासाच्या आतच झाला भावाचाही मृत्यू
पोलिसांच्या माहितीनुसार, शाहिदच्या ११ महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूला २४ तास झाले नव्हते की त्याच्या अडीच वर्षाच्या मुलाची देखील तब्येत बिघडू लागली. शाहिदच्या मुलालाही उलट्या होऊ लागल्या. पहाटे पाचच्या सुमारास शाहिदने रुग्णवाहिका बोलावली. सुमारे अडीच तासानंतर रुग्णवाहिका राघवगडला पोहोचली. शाहीदचा मुलगा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचाही मृत्यू झाला. त्याचबरोबर या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेत देवास येथे पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांसह १९ लोकं केले गेले क्वारंटाइन
अवघ्या २४ तासात दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच डबल चौकीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शीला वर्मा या आपल्या पथकासह राघवगड गावात पोहोचल्या. जिथे त्यांनी शाहीदच्या घरातील सर्व सदस्यांची स्क्रिनिंग केली. अद्याप मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नसून दोघांचा जवळजवळ एकाच प्रकारे मृत्यू झाला असल्याने प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून कुटुंबातील १९ सदस्यांसह आसपासच्या लोकांना क्वारंटाइन केले आहे.