महाबळेश्वरला 121 मिमी तर नवजा येथे 166 मिमी पाऊस ! कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राधानगरी येथे गेल्या २४ तासात १७० मिमी पावसाची नोंद झाली असून धरण १०० टक्के भरले असल्याने सध्या धरणातून ११ हजार ३९६ क्युसेक पाणी भोगावती नदीत सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर कुंभी, कासारी धरणातूनही विसर्ग सुरु आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपासून केवळ ३ मीटर खाली आहे. सकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, आजही घाट परिसरात मोठा पाऊस झाल्यास धरणातून पाणी सोडण्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे कोल्हापूरला पुन्हा एकदा पुराचा विळखा बसण्याची शक्यता असून एनडीआरएला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गावातील लोकांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

महाबळेश्वरला मुसळधार पाऊस

महाबळेश्वर येथे गेल्या २४ तासात १२१ मिमी तर नवजा येथे १६६ मिमी पाऊस झाला आहे. कोयना धरण परिसरात १३१ मिमी पावसाची नोंद झाली असून सध्या धरणातून ६८ हजार ३०४ क्युसेक पाणी कोयना नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे सांगली येथील आर्यविन पुलाजवळील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.

मुंबईसह कोकणात सर्वत्र पाऊस सुरु आहे. चिपळूण १८४, खेड, ७८, साटवली १६०, शिर्शी १०९, कुळवडी १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांचे हाल होत आहे.

Loading...
You might also like