धक्कादायक ! PI ने घडवून आणला शेतकर्‍यावर खुनी हल्ला, FIR दाखल, पोलिस निरीक्षकाने फेटाळले आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील चाकण परिसरातील शेतकऱ्यावर आठ ते दहा जणांनी खुनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोपट घनवट असे या शेतकऱ्याचे नाव असून या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. यापूर्वी केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप घनवट यांनी केला आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, चव्हाण यांना आरोपी करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण हे सध्या रत्नागिरी येथे जात पडताळणी विभागात कार्यरत आहेत. शेतकरी पोपट घनवट यांनी सांगितल्यानुसार, याआधी चव्हाण यांच्या विरोधात सीआयडी, लाचलूपचत प्रतिबंध विभाग अशा ठिकणी तक्रारी केल्याचा राग मनात ठेवून पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या हल्ल्यानंतर घनवट यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे.

तर यासंदर्भात बोलताना पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. पोपट घनवट यांचा मुलगा दुसऱ्या एका गुन्ह्यात आरोपी असल्याने त्यांना मदत करावी म्हणून माझ्यावर आरोप करुन मला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलं. असं चव्हाण यांनी सांगितलं.

तसेच प्रकरणातील इतर आरोपींनी पोपट घनवट यांच्यावर आरोप करत म्हटलं की, घनवट आमची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामधूनच घनवट यांच्याशी वाद झाला. परंतु, पोलिसांनी फक्त घनवट यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद केला. पण आम्ही केलेल्या तक्रारीची दखल सुद्धा पोलीस घेत नाहीत, असे आरोपींचे मत आहे.