PM मोदींनी केली Health ID Card ची घोषणा, जाणून घ्या काय होणार सर्वसामान्यांना फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ७४ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ‘वन नेशन वन रेशन कार्ड’च्या धर्तीवर ‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’ची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केल्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक हेल्थ कार्ड तयार केले जाईल. या योजनेंतर्गत प्रत्येक व्यक्तीचा आरोग्य डेटा एकाच व्यासपीठावर असेल. या डेटामध्ये डॉक्टरांच्या तपशीलासह आरोग्य सेवांविषयीची माहिती देशभर उपलब्ध असेल.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आजपासून देशात आणखी एक मोठी मोहीम सुरू होणार आहे. हे राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान आहे. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणेल.’

काय आहे ‘वन नेशन वन हेल्थ कार्ड’
सरकारच्या वन नेशन वन हेल्थ कार्ड योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला आरोग्य कार्ड बनवून घ्यावे लागेल. यातून होणाऱ्या उपचार आणि चाचणीबद्दलची संपूर्ण माहिती डिजिटलपणे या कार्डमध्ये जतन केली जाईल. त्याची नोंद ठेवली जाईल. याचा सर्वात मोठा फायदा हा होईल की, जेव्हा देशातील कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरांकडे उपचारासाठी जाल तेव्हा तुम्हाला सर्व पावत्या आणि चाचणी अहवाल नेण्याची आवश्यकता नसेल. डॉक्टर कोठेही बसून तुमच्या युनिक आयडीद्वारे सर्व वैद्यकीय नोंदी पाहू शकतील.

अशा प्रकारे काम करेल हेल्थ कार्ड
एखाद्या व्यक्तीचा वैद्यकीय डेटा ठेवण्यासाठी रुग्णालये, दवाखाने, डॉक्टरांना सेंट्रल सर्व्हरशी जोडले जाईल. रुग्णालय आणि नागरिकांसाठी आता त्यांना या मोहिमेमध्ये सामील व्हायचे आहे की नाही, हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल. प्रत्येक नागरिकाला एक युनिक आयडी देण्यात येईल. त्याच्या आधारावर लॉगिन केले जाईल. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियान मुख्यतः चार गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. हेल्थ आयडी, वैयक्तिक आरोग्याची नोंद, देशभरातील डिजी डॉक्टरांची आणि आरोग्य सुविधांची नोंदणी.