20-20 च्या पराभवानंतर धोनी ची चिंता

नवी  दिल्ली : वृत्तसंस्था – टी-20 मालिकेमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भारताचा संघ उद्यापासून ऑस्ट्रेलियासोबत पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेचा शुभारंभ करणार आहेत. हैदराबादमध्ये होणाऱ्या या सामन्यापूर्वी भारताचा संघ नेटमध्ये कसून सराव करत आहे. याच दरम्यान माजी कर्णधार आणि फिनिशर धोनीला दुखापत झाली आहे. धोनीच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.

धोनीला दुखापत झाल्याने तो खेळणार की नाही यावर शंका उपस्थित केल्या जात आहे. धोनी उद्याच्या लढतीत उतरू शकला नाही तर त्याच्या जागी आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला संधी मिळेल. तसेच विश्वचषकापूर्वी फलंदाजांची चाचणी घ्यायची असल्यास राहुल किंवा रायडूला संधी मिळू शकते.

37 वर्षीय धोनीने शुक्रवारी नेटमध्ये बराच काळ सराव केला. याच दरम्यान थ्रोडाऊन घेत असताना राघवेंद्रचा चेंडू धोनीच्या डाव्या हातावर जोराने आदळला. यानंतर धोनीने पुन्हा फलंदाजी केली नाही. धोनीची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तसेच उद्या होणाऱ्या लढतीत तो मैदानात उतरणार की नाही याबाबत सायंकाळी माहिती मिळेल. काही दिवसांपासून भारतीय संघाला दुखपतीचे ग्रहण लागले आहे.