भारत-चीन सीमेवर तणाव कमी करण्यासाठी 5 कलमी कार्यक्रमावर ‘एकमत’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारत आणि चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताकडून तणाव कमी करण्यासाठी सततच चर्चेच्या आवाहनानंतरही चीनच्या कुरापती सुरूच आहेत. अशा परिस्थितीत भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्कोत एक चर्चा पार पडली. त्यामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत तब्बल दोन तास चर्चा केली. यावेळी सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये 5 कलमी कार्यक्रमावर एकमत झाले आहे.

दोन्ही देशातील चर्चेनंतर सैनिकांची संख्या कमी करण्याच्या प्रक्रियेतही गती आणण्यावर भर दिला जाणार आहे. भारत आणि चीन या दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध विकसित करण्यासाठी नेत्यांच्या सहमतीवरून मार्गदर्शन घ्यावे. दोन्ही देशांतील मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये, असेही बैठकीत ठरवण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयतर्फे सांगण्यात आले आहे. सैनिकांना सीमेवरून हटवण्याच्या प्रक्रियेत गती आली पाहिजे, तणाव कमी झाला पाहिजे अशा गोष्टींवर एकमत झाल्याचंही दोन्ही देशांकडून सांगण्यात आले. दोन्ही देशांमध्ये असलेले संबंध योग्य दिशेने पुढे नेले जातील. अशा कोणत्याही समस्या आणि आव्हाने नसून ती दूर केली जाऊ शकत नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.