‘अंडेफेक’ झालेल्या ‘त्या’ पाकिस्तानी मंत्र्यानं सांगितली भारताविरूध्दच्या युध्दाची ‘तारीख’ ! (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात नेला. यानंतर या मुद्द्यावर समर्थन मागणाऱ्या पाकिस्तानचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला असून सुरक्षा परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देणारा चीन देखील तोंडघशी पडला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान विविध राष्ट्रांकडे याप्रकरणी मदत मागत असून सध्या पाकिस्तान एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

याचबरोबर पाकिस्तान दुसरीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धाची तयारी करत असून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केले असून युद्धसाहित्य देखील मोठ्या प्रमाणावर आणून ठेवले आहे. माहितीनुसार पाकिस्तान याठिकाणी भारताविरुद्ध छोट्या युद्धाची तयारी करत असून यासाठी युद्धसाहित्य गोळा करून ठेवत आहे. त्यानंतर आता पाकिस्तान सरकारमधील मंत्री शेख रशीद यांनी भविष्यवाणी करताना भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाच्या तारखेची देखील घोषणा केली आहे.

पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, शेख रशीद यांनी म्हटले आहे कि, ऑक्टॉबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते. त्याचबरोबर त्यांनी धमकी देताना म्हटले कि, पाकिस्तान जवळ असलेली हत्यारे दाखवण्यासाठी नसून वापरण्यासाठी आहेत. आम्ही काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये वारंवार उचलणार असून मी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरचा दौरा करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान शेवटच्या श्वासापर्यंत काश्मीरसाठी लढणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले.

लंडनमध्ये फेकले होते अंडे
पाकिस्तानच्या याच मंत्र्यांवर काही दिवसांपूर्वी अंडी फेकण्यात आली होती. त्यांनी भारतावर अणुबॉम्ब टाकण्याचे वक्तव्य केल्यानंतर ते लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर लंडनमध्ये नागरिकांनी हल्ला करत मोठ्या प्रमाणात अंडी फेकली होती. त्याचबरोबर या मंत्र्यांकडून मागील मागील काही दिवसांपासून सतत वादग्रस्त वक्तव्य समोर येत असून त्यांनी म्हटले होते कि, जर भारताने पाकव्याप्त काश्मीरवर हल्ला केला तर भारतीय उपखंडातील सर्वात मोठे युद्ध होऊन जगाचा नकाशा बदलून जाईल.

दरम्यान, याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील अनेकदा भारतावर अणुबॉम्बने हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या मंत्र्यांकडून होणाऱ्या अशा विधानांचे आश्चर्य वाटायला नको.

आरोग्यविषयक वृत्त –