Coronavirus : भारताची चिंता वाढली,ऑगस्टमध्ये सर्वाधिक नव्या ‘कोरोना’ रुग्णांची नोंद ! ब्राझील, US ला ही टकालं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज लाखो लोकांना कोरोनाची लागण होत आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये देशात नवे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने देशाची चिंता वाढली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसातील भारतातील कोरोना रुग्णांची आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.

सध्या जगात सर्वाधिक जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशांमध्ये अमेरिका पहिल्या, ब्राझील दुसऱ्या आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, ऑगस्टमधील कोरोना बाधितांच्या संख्येने भारताची चिंता वाढली आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठ दिवसात जगातील सर्वात जास्त नव्या कोरोना रुग्णांची नोंद भारतात झाली आहे. भारतात 8 दिवसात एकूण 4.55 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच दररोज सरासरी 54 हजार कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.

भारतामध्ये 31 जुलै रोजी कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16.97 लाख होती. 8 ऑगस्टला ही संख्या 21.52 लाख एवढी झाली आहे. 1 ऑगस्ट रोजी जवळपास 54 हजार नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. तर 8 ऑगस्टला तब्बल 65 हजारांच्या वर गेली. रुग्ण वाढीचा हा वेग अत्यंत भयंकर आहे. जगभरातील कोरोना व्हायरसच्या 50 टक्के पेक्षा जास्त प्रकरण फक्त भारत, ब्राझील आणि अमेरिका या तीन देशांमध्ये आहेत. या तिन्ही देशांतील ऑगस्टच्या 8 दिवसातील नवीन प्रकरण पाहिली तर भारतात 4.55 लाख, ब्राझील 3.47 लाख आणि अमेरिकेत 4.42 लाख प्रकरण आहेत.

जगाची आकडेवारी पाहता ऑगस्टमध्ये 20 लाखांपेक्षा जास्त नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. 1 ऑगस्टला जगभरातील कोरोना बाधितांची संख्या 1.77 कोटी होती. 8 ऑगस्ट रोजी हीच संख्या 1.97 कोटी म्हणजेच दोन कोटींच्या जवळपास पोहचली आहे. जगभरातील एकूण प्रकरणांपैकी 11 टक्के प्रकरणे ही एकट्या भारतातील आहेत. मात्र, ऑगस्टमधील नव्या प्रकरणांचा विचार केला तर भारतात सर्वात जास्त 25 टक्क्यांपेक्षाही जास्त प्रकरणं आहेत. याचाच अर्थ असा की एकूण सर्वाधिक प्रकरणांमध्ये अद्याप तरी भारत तिसऱ्या क्रमांकावर असला तरी नव्या प्रकरणांच्या बाबतीत भारत ऑगस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.