उद्योगांना मिळू शकेल दिवाळीचा ‘बोनस’, मोदी सरकारनं दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनमुळे फटका बसलेले उद्योग – धंदे आता पूर्वपदावर येत आहेत. मात्र या उद्योगांना अजूनही काही मदतीची अपेक्षा असून उद्योगांना दिवाळीचा बोनस (business/industries-may-get-diwali-bonus) मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Smt Nirmala Sitharaman) यांनी गेल्या आठवड्यात उद्योगांना अजून पॅकेज मिळू शकण्याचे व्यक्त केलेले मत हे उद्योगांसाठीच्या दिवाळीचे संकेत मानले जात आहेत.

शहरी भागातील पायाभूत क्षेत्राला अद्यापही सरकारी मदतीची गरज वाटत आहे. या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता असल्याने सरकारतर्फे या क्षेत्राला मदतीचे पॅकेज जाहीर होण्याची शक्यता अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. याशिवाय आतिथ्यशीलता आणि पर्यटन या दोन्ही क्षेत्रांनाही सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे. या उद्योगांना बसलेल्या जबर फटक्यातून सावरण्यासाठी सरकारकडून त्यांना पॅकेज दिले जाण्याची शक्यताही आहे. कोरोनाचा फटका बसलेल्या उद्योगांना मदतीचे आणखी पॅकेज देण्याबाबत अर्थमंत्रालयाकडून गंभीरपणे विचार सुरू असून, अर्थ मंत्रालयाचे अधिकारी हे पॅकेज कसे असावे याचा आराखडा तयार करीत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. हे पॅकेज दिवाळीपूर्वीच जाहीर होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते.

राष्ट्रीय पायाभूत योजनेमध्ये मंजुरीसाठी असलेल्या 20 ते 25 प्रकल्पांना मंजुरी देऊन त्यांच्या माध्यमातून पायाभूत क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी वाढविण्याला सरकारकडून हातभार लावला जाणार असल्याचे समजते.

आतापर्यंत तीन पॅकेज
मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर उद्योगक्षेत्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहे. या क्षेत्राला मदत म्हणून केंद्र सरकारने आतापर्यंत तीन वेळा पॅकेज जाहीर केली आहेत. मार्च महिन्यामध्येच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या नावाने 1.70 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले. त्यानंतर मे महिन्यामध्ये उद्योगांसाठी 20.97 लाख कोटी रुपयांची योजना जाहीर केली आहे. त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी काही घोषणा करून उद्योगांना सवलती जाहीर केल्या आहेत.