त्याची झाली चांगलीच गोची… पाहत होता मधुचंद्राची स्वप्न… पण मिळाली पोलीस कोठडी 

यावल: वृत्तसंस्था – यावल शहरातील कुंभारटेकडीजवळ काही दिवसांपूर्वी घरफोडी करण्यात आली होती. याच प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून शेख शोहेब शेख हारून (रा. बाहेरपुरा, यावल) याला पकडले. पण महत्वाची गोष्ट अशी की याप्रकरणी पोलिसांनी २७ नोव्हेंबरला तीन संशयीतांना अटक केली होती. त्याच दिवशी शोहेबचे नाव संशयीत म्हणून समोर आले होते परंतु अटकेपूर्वी त्याच्याविरोधात सबळ आवश्यक असल्याने पोलिसांना तीन दिवस थांबावे लागले. २७ नोव्हेंबरला त्याचा विवाह होणार होता. जेव्हा वधूपक्षाला या सर्वाची कुणकुण लागली तेव्हा मात्र मधुचंद्राचे स्वप्न पाहणाऱ्या शोहेबचे लग्न वधूपक्षाने मोडले आणि त्याची थेट रवानगी पोलीस कोठडीत केली.
काय आहे नेमके प्रकरण 
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकिय विश्रामगृहाजवळ कुंभार टेकडी आहे. या ठिकाणी कुंभार समाज बांधव वास्तव्य करतात. दिवसा हे बांधव विटा थापण्यास घराला कुलूप लावून जातात. १४ नोव्हेंबरला दिवसा या वस्तीत भगवान वसंत कुंभार यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी ११ हजार १४५ रूपयांचे सोन्या, चांदीचे दागिन्यांसह १० हजार रुपयांची रोकड लांबवली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे शहरात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी यावल पोलिसांनी तपासचक्र फिरवले असता चोरटे शहरातीलच असताचा अंदाज बांधण्यात आला. शहरात भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांवर पाळत ठेवण्यात आली. त्यातून एकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. सदर घरफोडी ही अलताफ खान रशीद खान (वय-२५, रा.बाबुजीपुरा, यावल), मोमीन नदीम शेख ताहेर (वय-१९, रा.डांगपूरा, यावल) व तौसिफ खान महेमुद खान (वय-२२) यांनी केल्याचे समोर आले. या घरफोडीत चोपडा रस्त्यावरील शेख शोहेब शेख हारून हा देखील असल्याचे पोलिसांना समजले होते. २६ नोव्हेंबरला रात्री पोलिस बाहेरपुऱ्यात जाऊन चौकशी केली असता शोहेब याचा २७ नोव्हेंबरला विवाह असल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. शोहेबविरुद्ध ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार गोरख पाटील करीत आहे.

…आणि लग्न मोडून थेट  पोलिस कोठडी

या घरफोडीत शेख शोहेब यांच्यावर पोलिसांचा दाट संशय होता व ते त्याच्या लग्नाच्या पूर्वसंध्येला त्याच्याकडे आले होते. ही बाब वधुकडील मंडळींना समजली. वधुपित्याने ऐनवेळी लग्न मोडले. नियोजित वधुचे गावातीलच तरूणासोबत विवाह लावण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा गुन्ह्यात सहभाग या शोहेबला चांगलाच भोवला. मधुचंद्राचे स्वप्न पाहाणार्‍या शोहेबच्या नशिबी थेट पोलिस कोठडी आली.