Pimpri News : संतापजनक ! पिंपरीत कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळले, कावळेही आढळले मृतावस्थेत

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुत्र्याला टेरेसवरून फेकून मारल्याची घटना ताजी असतानाच कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मन हेलावून टाकणारी ही घटना सांगवी येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरातील पिंपळे गुरव भागात राहणाऱ्या विनोद मुरार या व्यक्तीचा पाळीव कुत्रा बाहेर फिरुन घरी आला. तेव्हा त्याच्या तोंडाला फेस आला होता. काही वेळाने त्याचा मृत्यू झाला. हे असं कसं अचानक घडलं हे पाहण्यासाठी त्यांनी शोधाशोध केली असता यांना त्यांच्या आणखी एका कुत्र्याचा मृतदेह आढळला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुरार यांना एका पोत्यात जळालेला कुत्र्याचा मृतदेह आढळून आला.

तसेच मुरार यांना दोन कावळे देखील मृत असल्याचे निदर्शनास आले. हा विषप्रयोग केल्याचा प्रकार असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी तातडीने सांगवी पोलिसांनी याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही कुत्र्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. दरम्यान अहवाल आल्यानंतर याबाबत पुढील माहिती समोर येईल. अद्याप या प्रकरणात कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सात महिन्यांच्या कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली होती. पिंपरी शहरातील पिंपळे गुरव भागात ही घटना घडली होती. अज्ञात व्यक्तीने भटक्या कुत्र्याला खाली फेकून दिले. ही बाब फरिनजहा शेख नामक महिलेच्या लक्षात आणि त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केल्या नतंर हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल होताच प्राणीमित्र संघटना आणि खासदार मनेका गांधी यांनी थेट सांगवी पोलिसांशी संपर्क साधत प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्याची विनंती केली होती.