8 दिवसात जेजुरीचे खंडोबा मंदिर न उघडल्यास मनसेचे तीव्र आंदोलन

जेजुरी : गेली सात महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे जेजुरीचे खंडोबा मंदिर बंद आहे. देव दर्शन व कुलाचारासाठी जेजुरीत येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने होणारा व्यवसाय यावर जेजुरीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे .सध्या जेजुरी शहराची अर्थव्यवस्था कोलमडली असून असंख्य नागरिकांची उपासमार सुरु आहे,ती थांबविण्यासाठी शासनाने आठ दिवसात खंडोबा देवाचे मंदिर उघडावे अन्यथा राज्यातील हजारो मनसैनिक जेजुरीत येवून तीव्र आंदोलन करतील असा ईशारा मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी दिला आहे.

गुरुवार दि २४ रोजी मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते जेजुरी गडाच्या पायथ्यापर्यन्त खंडोबा मंदिर शासनाने उघडावे यासाठी पदयात्रा काढली. जेजुरी गडाच्या पायथ्याशी जावून खंडोबा देवाचा तळीभंडार व आरती केई. भंडारा उधळून मंदिर लवकर उघडू दे,जेजुरीकरांची रोजी रोटी सुरु होवू डे,व कोरोनाचे संकट लवकर जावूदे असे साकडे देवाला घालण्यात आले. आठ दिवसात शासनाने खंडोबा मंदिर न केल्यास तीव्र आंदोलन करण्यासंदर्भाचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी मनसेचे नेते राजेंद्र वागसकर, पुणे शहर मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील, पुणे जिल्हा मनसेचे अध्यक्ष ॲड विनोद जावळे, पदाधिकारी नरेंद्र तांबोळी, सचिन पांगारे, मनीषा कावेडिया तालुकाध्यक्ष उमेश जगताप,भाजपच्या तालुका महिला अध्यक्षा अलका शिंदे व मनसैनिक उपस्थित होते. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.