अमेरिकेच्या सैन्य तळांवरील हल्ल्यात 80 ठार, इराणचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इराणने अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 80 जण ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणमधील इंग्लिश न्यूज चॅनलनं याबाबत माहिती आहे. या न्यूज चॅनलने ट्विट करत म्हटले आहे की, “इराकमधील अमेरिकेच्या तळांवर इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 80 जण ठार झाले आहेत.” जर हे वृत्त खरं असेल तर इराण-अमेरिकेतील तणाव आणखी वाढून ही लढाई गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे.

दरम्यान या हल्ल्यानंतर अमेरिकेने प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, सर्वकाही आलबेल आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत ट्विट केलं आहे. ट्रम्प आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, “ऑल इज वेल! इराणकडून इराकमधील दोन लष्करी तळांवर हल्ला करण्यात आला आहे. जीवितहानी आणि नुकसानीची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत सगळं काही ठिक आहे. सध्या तरी आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य आहे. उद्या सकाळी आम्ही यासंबंधी निवेदन जारी करू.” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

3 जानेवारी इराकची राजधानी बगदादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर एअरस्ट्राईक झाला. यात इराणचे लष्करी कमांडर कासिम सुलेमानी ठार झाले. या हत्येनंतर इराणमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. या हत्येचा बदला घेणार असल्याची धमकीही इराणने दिली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/