पहिल्या लोकसभेतील खासदार कमल बहादुर यांचं 93 व्या वर्षी निधन

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशातील पहिल्या लोकसभेचे एकमेव जिवंत सदस्य आणि बिहारच्या डुमराव राजचे शेवटचे महाराज कमल बहादुर सिंह यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांचे पुत्र चंद्रविजय सिंह म्हणाले की, रविवारी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचा मृतदेह बक्सर जिल्ह्यातील भोजपूर येथील कोठी येथे ठेवण्यात आला. सोमवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

कमल सिंग यांचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी जवळचे संबंध होते. असे म्हणतात की वाजपेयींच्या प्रभावामुळेच त्यांनी जनसंघाचे सदस्यत्व घेतले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शहाबादमधील शिक्षण आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

चंद्रविजय सिंह म्हणाले की, माजी खासदार कमलसिंग यांनी रविवारी सकाळी ५.१० वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर शहाबाद परिसरात शोककळा पसरली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार अश्विनी कुमार चौबे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटले की, ‘एक सुवर्ण आणि गौरवशाली भूतकाळ संपुष्टात आला आहे.’

स्वातंत्र्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत कमलसिंग शहाबादमधून खासदार म्हणून निवडले गेले. १९५७ मध्ये झालेल्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत बक्सर संसदीय मतदार संघ अस्तित्त्वात आला. येथूनही लोकांनी त्यांना त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडले आणि लोकसभेवर पाठवले. कमलसिंग यांनी जुन्या शहाबाद जिल्हा (सध्या बक्सर, सासाराम, भोजपूर, कैमूर) आणि उत्तर प्रदेशच्या परिसरात शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात खुलेपणे जमीन आणि संसाधने दान केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/