कृत्रिम हृदय बनविण्याकडे शास्त्रज्ञांची यशस्वी वाटचाल

पोलीसनामा ऑनलाइन – ३ डी प्रिंटरच्या सहाय्याने खेळणी, वाहनांचे सुटे भाग तसेच अन्य वस्तू बनविल्या जात होत्या. मात्र, आता शास्त्रज्ञांनी आणखी नवीन तंत्रज्ञान विकसीत केले असून या तंत्रज्ञानाचा वापर करून हृदयाची थ्रीडी प्रिंट काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. नाक-कानासारखे अवयव तयार करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. इस्रायलमधील तेलअवीव विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवी पेशी आणि रक्तवाहिन्या वापरून चक्क हृदयाची निर्मिती केली आहे.

मानवी शरीरातील हृद्य, यकृत, डोळे असे अवयव निकामी झाले, तर ते अन्य शरीरातून प्रत्यारोपीत करण्याचे तंत्रज्ञान आता सहज उपलब्ध आहे. त्यासाठीच अवयवदानाबाबत जागृती करून त्याचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्नही केले जातात. कारण स्वतंत्रपणे हुबेहुब मानवी अवयव बनविणे शक्य नाही. गर्भजलाच्या माध्यमातून असे अवयव कृत्रिमपणे विकसित करण्याचे प्रयोगही जगभरात सुरू आहेत. पण त्यात अजूनही हवे तसे यश प्राप्त झालेले नाही. दरम्यान, तेलअविवमध्ये झालेल्या या संशोधनाने जगाचे लक्ष वेधले आहे. या शास्त्रज्ञांनी सांगितले की, ३ डी प्रिंटरच्या साहाय्याने अनेकांनी हृदयाच्या प्रतिकृती बनविल्या आहेत.

पण प्रत्यक्ष मानवी पेशी, रक्तवाहिन्या, कप्पे आदी असलेले हे हृदय प्रथमच तयार करण्यात आले आहे. मात्र हे कृत्रिम हृदय अजूनही प्रत्यारोपणासाठी सक्षम झालेले नाही. कारण मानवी हृदयाप्रमाणे कप्प्यांची उघडझाप करून ते धडधडते ठेवण्याचे तंत्रज्ञान शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. पण संशोधनाचा हाच वेग कायम राहिल्यास वर्षभरात हे हृदय प्राण्यामध्ये प्रत्यारोपित करण्याचा प्रयोग करून पुढील दहा वर्षांत प्रत्यक्ष मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यास सक्षम हृदयाची निर्मिती करता येईल, असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. असे झाल्यास गुडघ्याच्या कृत्रिम वाट्या, दात, केस यांप्रमाणे हृद्यासारखे अवयवही लवकरच कृत्रिमरित्या तयार करता येतील आणि अनकांना जीवदान मिळू शकेल.