पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा माफी मागा….अन्यथा, काँग्रेस मंत्र्यानेच दिला इशारा

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरुन ज्येष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवले. संबंधितांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी अत्यंत कडवट शब्दात टीका केली आहे.

पत्राद्वारे 23 काँग्रेस नेत्यांनी पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे. यात महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून आदरणीय सोनिया गांधीजी यांना माझा मन:पूर्वक पाठिंबा आहे. गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे.

आपल्या कृतीबद्दल या नेत्यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे असे सुनिल केदार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.माफी मागितली नाही तर काँग्रेस कार्यकर्ते या नेत्यांना राज्यात मुक्तपणे फिरु देणार नाहीत. सोनिया गांधी अध्यक्षपदावर असतील तरच काँग्रेस पक्ष भाजपा सरकारविरोधात लढू शकतो. त्यांच्या नेतृत्वाच्यामागे भक्कमपणे उभे राहण्याची ही वेळ आहे असल्याचे केदार यांनी म्हटले आहे.