पोलीस कर्मचाऱ्याचा सासुरवाडीत अंदाधुंद गोळीबार; पत्नीसह सासू-सासरे ठार

जम्मू : वृत्तसंस्था – पत्नीबरोबर सुरु असलेल्या वादाला कंटाळून एका पोलीस कर्मचाऱ्याने सासुरवाडीत जाऊन अंधाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना मंगळवारी रात्री जम्मूतील सतवारीमध्ये घडली. या अंदाधुंद गोळीबारात पत्नी, सासू सासरे यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या पोलीस कर्मचाऱ्याला गजाआड केले आहे. दरम्यान. या पोलीस कर्मचाऱ्याने तब्ब्ल दोन डझन गोळ्या झाडल्या आहेत. ‘ड्यूटी संपल्यानंतरही हत्यार घेऊन त्याला कसे जाऊ दिले? असा प्रश्न नातेवाईकांनी विचारला आहे.

राजेंद्र कुमार उर्फ रवी असे या प्रकरणातील आोरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तर पत्नी सीमादेवी, सासू राजकुमारी आणि सासरे राकेशकुमार अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री राजेंद्रने सासुरवाडीला जाण्यापूर्वी सर्वजण घरी आहेत कि नाही याची खात्री केली. आपल्याला बढती मिळाली असल्याचे सांगत राजेंद्रने घरात मिठाई देखील वाटली. घरात प्रवेश केला. अन उपस्थित व्यक्तींवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या सासू राज कुमारी यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सीमा देवी आणि सासरे राकेश कुमार गंभीर जखमी झाले. त्या दोघांचा हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, राजेंद्रने दोन्ही मेव्हणे आणि चुलत सासऱ्यांवरही गोळीबार केला होता. मात्र ते घरातील खोलीमध्ये लपून बसले होते. त्यानंतरही त्याने त्यांच्या खोलीच्या खिडकीवर गोळीबार केला. घटनेनंतर राजेंद्र फरार झाला होता. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी राजेंद्रला सापळा रचून अटक केली. प्राथमिक तपासामध्ये राजेंद्र आणि पत्नी सीमादेवी यांच्यात बऱ्याच दिवसापासून वाद सुरु होता. त्याच्या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेरी राहत होती. त्यामुळे संतापलेल्या राजेंद्रनं हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.