महादेव जाणकारांना मोठा धक्का ; ‘रासप’च्या ‘सवंगड्या’चा ‘राष्ट्रवादी’मध्ये प्रवेश

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच रासपचे नेते महादेव जानकर यांना मोठा धक्का बसला आहे. जाणकारांचे निकटवर्तीय बापूराव सोलनकर यांनी कार्यकर्त्यांसह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. बापूराव सोलनकर हे रासपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आहेत.

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. २३ एप्रिलला तिसऱ्या टप्यात महाराष्ट्रातील १४ मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये बारामती मतदार संघाचाही समावेश आहे. याचदाम्यान, रासपचे नेते महादेव जानकर यांचे निकटवर्तीय रासपचे बारामती लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष बापूराव सोलनकर यांनी कार्यकर्त्यांसह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या सुपे येथील सभेत प्रवेश केला. बापूराव सोलनकर यांनी नुकताच पदाचा राजीनामा देत रासपला रामराम ठोकला आहे.

यावेळी, बापूराव सोलनकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यामुळे पक्षाला त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद प्राप्त होईल. सोलनकर हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत. सोलनकर यांनी महादेव जानकर यांच्या बरोबर अनेक वर्षे काम केले, पण त्यांना न्याय मिळाला नाही. असे अजित पवार यांनी त्यावेळी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, बापूराव सोलनकर यांचे संघटनात्मक काम चांगले आहे. राष्ट्रवादीला नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यांना रासप पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योग्य तो मानसन्मान दिला जाईल. असेही अजित पवार यमाई म्हंटले.

तसेच, जी जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला सोपवली जाईल ती पार पडेल असे बापूराव सोलनकर यांनी म्हंटले.