जपानमध्येही पुण्याचाच डंका ! निवडणूकीत योगेंद्र पुराणिक विजयी

टोकियो : वृत्तसंस्था – मूळचे पुण्याचे नागरिक असलेले योगेंद्र पुराणिक जपानच्या निवडणूकीत जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. त्यांना ‘इडोगावा म्युनिसिपल कॉर्पोरेशन’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली होती. या निवडणुकीत त्यांना ६,४७७ मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्यांना मिळालेली मते ही तेथील २,२६,५६१ मतांमध्ये पाचव्या क्रमांकाची सर्वाधिक मते ठरली आहेत.

गेल्या १० वर्षांपासून योगी ‘कॉन्सीट्यूएंट डेमोक्रेटिक पार्टी ऑफ जपान’ (CDP) या पक्षामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक जाहिरनाम्यामध्ये योगेंद्र यांनी व्यावसायिक शिक्षण आणि प्रत्येक मुलाला सरकारी शाळेत शिक्षण मिळावे, अशा अनेक मुद्दांचा समावेश केला होता. त्यांनी जपानमधील इडोगाव मतसंघातून निवडणूक लढवली. या विभागात जवळजवळ ४ हजार ५०० भारतीय स्थायिक आहेत. जपामध्ये राहणाऱ्या सर्वाधिक भारतीयांची संख्या जवळपास १० % येथेच आहे. जपानमध्ये जपानचे नागरिकत्व स्वीकारलेल्या रहिवाशांनाच मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे तिथे राहणाऱ्या अत्यल्प संख्येतील भारतीय नागरिकांनी या निवडणुकीत योगेंद्र यांना मतदान केले. त्यामुळेच योगींना येथून विजय मिळवता आला.

पुराणिक हे मूळ पुण्याचे असून १९९७ साली ते शिक्षणानिमित्त जपानला गेले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जपानच्या आयटी कंपनीमध्ये काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर बँकिंग क्षेत्रात नोकरी सोडल्यानंतर ते जपानच्या राजकारणात सक्रिय आहेत. ही निवडणूक जिंकल्यामुळे जपानच्या इतिहासात जपानी नसलेला पहिला लोकप्रतिनिधी म्हणून योगेंद्र यांची नोंद झाली आहे.