जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात द्राक्षांची आरास

जेजुरी : जेजुरी गडावरील खंडोबा मंदिरातील गाभाऱ्यात 451 किलो द्राक्षांची सजावट करण्यात आली. आज मंगळवारची खंडोबाची पुजा अभिषेक द्राक्षाच्या माध्यमातून करण्यात आली. खंडोबाचा गाभारा वेलींना लगडलेल्या द्राक्षाच्या बागेप्रमाणे मनोहरी दिसत होता.

उन्हाळ्याच्या दिवसात खंडोबाला फळांची पुजा केली जाते. फुलांची, आंब्याची, दिवाळीच्या फराळाची, भंडाऱ्याची , रंगाची खंडोबाला पुजा व सजावट नेहमी होते. मात्र, यंदा द्राक्षाची बागच खंडोबाच्या भेटीसाठी गाभाऱ्यात अवतरली होती, असे चित्र तयार झाले होते. मंगळवारी दुपारी सुमारे चारशे किलो द्राक्षाची सजावट गाभाऱ्यात करण्यात आली होती.

कासेगाव (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील खंडोबा भक्त संभाजीराव कृष्णांत देशमुख व अशोकराव कृष्णांत देशमुख यांनी यासाठी स्वतःच्या बागेतील 451 किलो द्राक्षे पाठवून दिली होती. जेजुरीतील ग्रामस्थ मयुर केंजळे यांच्या माध्यमातून ही द्राक्षे पुजेसाठी उपलब्ध झाली होती. पुजारी, देवसंस्थानचे कर्मचारी व मयुर केंजळे मित्र परिवाराच्या वतीने गाभाऱ्यात द्राक्ष वेलींची खंडोबाला आकर्षक सजावट करण्यात आली. मार्तंड भैरवाच्या मुर्तीला फुलाप्रमाणे द्राक्षाचा हार तयार केला होता. मुर्ती, स्वयंभू लिंगाला द्राक्षाची सजावट करण्यात आली होती. गाभाराही द्राक्षाची पाने व घडांनी सजविला होता. खंडोबाच्या भेटीसाठी द्राक्ष बाग अवतरल्याचे दृष्य दिसत होते.

पुजेसाठी द्राक्ष पाठविणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त संदीप जगताप यांनी देवसंस्थानच्यावतीने विशेष आभार मानले.