जेजुरी देवस्थानाकडून दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने गेली अडीच महिन्यांहुन अधिक काळ लॉकडाऊन च्या काळात पुरंदर व परिसरातील दिव्यांग (अपंग)बांधवांची उपासमार सुरु झाली आहे , हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे . सामाजिक बांधीलकीच्या जाणिवेतून श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने मदतीचा हात म्हणून सुमारे ७३ दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले .जेजुरी येथील मल्हार भक्तनिवासात जीवनावश्यक किट देण्यात आले . यावेळी प्रमुख विश्वस्त संदीप जगताप ,विश्वस्त तुषार सहाणे, शिवराज झगडे ,अशोकराव संकपाळ, सॉलि .प्रसाद शिंदे ,पंकज निकुडे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे यांचे हस्ते प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किट स्वीकारन केलेल्या मदतीबाबत देवसंस्थानचे आभार मानले आहेत.

प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग (अपंग )बांधवांनी जेजुरी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षा वीणाताई सोनवणे व मुख्याधिकारी पूनम शिंदे-कदम यांची भेट घेत मदत करण्याचे आवाहन केले होते .त्यावेळी किमान दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक वस्तू अपंग बांधवांना देण्यात येऊन मदतीचा हात द्यावा अशी मागणीही संघटनेने केली होती . यावेळी नगरपालिकेने मदत करण्याचे आश्वासन दिले होते . त्याच बरोबर स्थानिक अपंगांची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांना मिळताच त्यांनी देवसंस्थान विश्वस्त मंडळाशी संपर्क करीत मदत करण्याचे आवाहन केले . देवसंस्थानच्या वतीने आवाहनाला प्रतिसाद देत जेजुरी शहर परिसरातील सुमारे ७३ व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.