जेजुरीत रेल्वेच्या धडकेने महिला जागीच ठार

जेजुरी (संदीप झगडे) : पोलीसनामा ऑनलाइन – जेजुरी रेल्वे स्टेशनच्या पूर्वेच्या बाजूला रूळ ओलांडत असताना एका ७० वर्षीय वृद्धेला रेल्वे ने उडवल्याने प्राण गमवावे लागले. अपघात एवढा भयानक होता की या वृद्धेच्या देहाचे अक्षरशः तुकडे गोळा करावे लागले.

काल दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास जेजुरी रेल्वे स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला राहणाऱ्या मयत लिलावती नानासो पाटील (वय ७० वर्षे) या जेजुरी शहरातून रेशनिंग घेऊन घरी जात असताना रूळ ओलांडताना हा अपघात घडला. पुण्याच्या बाजूने येणाऱ्या यशवंतपुर संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या जोरदार धडकेने जागीच ठार झाल्या. ही एक्सप्रेस दिल्लीहून यशवंतपुर कर्नाटक कडे जात होती. मयत वृद्धेला पुण्याच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेचा अंदाज आला नाही. रेल्वे प्रशासनाने पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

तिर्थक्षेत्राचे ठिकाण असल्याने देशभरातून जेजुरीत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. हे भाविक रेल्वेनेच येत असतात. याशिवाय रेल्वे स्टेशनच्या दोन्ही बाजूला राहणाऱ्यांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी लोखंडी पादचारी पूलाचा मार्ग आहे. रेल्वे स्थानक दुरुस्ती दरम्यान एका अपघातात तो तुटल्याने गेल्या वर्षभरापासून बंद आहे. हा पादचारी मार्ग वाहतुकीस नादुरुस्त झाला असल्याने त्याची दुरुस्ती त्वरित होणे गरजेचे आहे. याबाबत स्थानिक रहिवाश्यांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागणी केलेली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले होते. मात्र फक्त वरचे पत्रे काढून ते काम तसेच अर्धवट सोडून देण्यात आले आहे. हा पादचारी मार्ग सुरू असता तर या महिलेचे प्राण वाचले असते. अपघातास रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

त्याच बरोबर तीर्थक्षेत्र जेजुरीत देव दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाला रेल्वे रूळ ओलांडूनच कर्हा स्नानासाठी जावे लागते. हे अत्यंत धोकेदायक असल्याने या ठिकाणी भूमिगत मार्ग किंवा उड्डाण पूल होणे गरजेचे बनले आहे. तशी मागणी स्थानिक नगरसेवक मेहबूब पानसरे यांनी केली आहे.