CRPF च्या कॅम्पवर हल्ला करणारा मास्टरमाईंड भारताच्या ताब्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य निसार अहमद तांत्रे याला संयुक्त अरब अमीरात (UAE) सुरक्षा यंत्रनेने भारताच्या ताब्यात दिले आहे. निसार हा दक्षिण काश्मीरचा जैशेचा कमांडर नूर तांत्रे याचा भाऊ आहे. जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा येथे डिसेंबर २०१७मध्ये सीआरपीएफच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यामागे निसारचा हात होता. ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले होते. तेव्हा झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार मारले होते.

विशेष विमानाने निसारला रविवारी दिल्लीत आणण्यात आले. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे त्याला सोपवण्यात आले. त्यांनंतर NIA कडून लेथपोरा येथे झालेल्या हल्ल्याची चौकशी केली गेली. या प्रकरणी NIA च्या स्पेशल कोर्टाच्या न्यायाधीशांनी निसारच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला होता. या आधारावर भारताने UAEकडे त्याचा ताबा मागितला होता. काश्मीर खोऱ्यात जैशेचे नेटवर्क उभे करण्याचे काम निसारचा भाऊ असेलल्या नूरने केले होते. त्याला डिसेंबर २०१७मध्ये एका चकमकीत ठार करण्यात आले होते.

दरम्यान, NIAच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निसार तांत्रे 2019 मध्येच भारतातून UAE मध्ये पळून गेला होता. त्यानंतर UAE ने त्याला भारताच्या ताब्यात दिले आहे. UAE ने गेल्या काही वर्षापासून भारताला अनेक गुन्हेगार सोपवले आहेत. विशेष म्हणजे यात दहशतवाद्यांचा देखील समावेश आहे. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य अब्दुल वाहिद सिद्दिबापा आणि मुंबईत ११९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी फारुख टकला या गुन्हेगारांना UAE ने भारताला सोपवले आहे.