‘सोशल डिस्टेंसिंग’चा सल्ला दुकानदाराला पडला महागात,गावकर्‍यांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यु

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी संपूर्ण देशात २१ दिवस लॉक डाऊन करायला सांगितले. सोशल डिस्टेंसिंग पाळायला सांगितले खरे पण, झारखंडमधील एका गावात एक भयानक घटना समोर आली आहे. ४५ वर्षाचा दुकानदार लोकांना सोशल डिस्टेंसिंग पाळायला सांगता होता़ त्याचे न ऐकता उलट गावकर्‍यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु झाला.

काशी साव असे या दुकानदाराचे नाव आहे. झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील चाक उदयपूर गावात बुधवारी ही घटना घडली.  काशी हा एक किराणा दुकान चालवितो. कोरोना विषाणूचा संसर्ग गावात होऊ नये, म्हणून तो गावकर्‍यांना सोशल डिस्टेंसिंग पाळायला सांगत होता. गावात चार जण आजारी होते. त्यांना त्यांनी तुम्ही गावात फिरण्याऐवजी घरात क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्याला महागात पडला.

काशी दुकानात असताना काही जणांनी त्याच्या दुकानावर हल्ला केला. दुकानाची मोडतोड केली. त्याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या काशीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या काशीचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मृत्यु झाला.