मुलाच्या मृत्यूचा वडिलांनी घेतला बदला, थेट महिलेचं शीर घेवून बाप पोहचला पोलिस ठाण्यात

पोलिसनामा ऑनलाईन – मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी वडिलांनी एका महिलेची हत्या केली आहे. 60 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने गळा चिरून शीर धडावेगळे केले. त्यानंतर शीर पोलीस ठाण्यात घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार पाहून पोलीसही चक्रावले होते. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.

झारखंडमधील साहिबगंजमधील मोहनपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. दोन दिवसांपूर्वी 25 वर्षीय तरुणाचा एका आजारामुळे मृत्यू झाला. मात्र गावात एकच चर्चा सुरू झाली की या मुलाचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाला. 60 वर्षीय महिला मतलू चौडे या महिलेने जादूटोणा केल्याने स्वाधीन टुडूचा मृत्यू झाल्याची गावात अफवा पसरली होती. त्यामुळे मुलाच्या वडिलांना संताप अनावर झाला. मुलाच्या मृत्यूचे दु:ख पचवत त्यांनी सूड घ्यायचा निश्चय केला. मुलाचा मृतदेह सुरक्षित ठिकाणी ठेवून वडील सकल टुडूने महिलेची गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर महिलेचे शीर घेऊन थेट पोलीस स्थानक गाठून बदला पूर्ण झाल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. मुलाचा आणि हत्या केलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे. अफवा पसरवणार्‍या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.