जितेंद्र आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाण प्रकरण ‘त्या’ पोलिसांना भोवणार ? निलंबनाची मागणी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –   एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट असताना जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर एका अभियंत्याला बेदम मारहाण करण्यात आली. याचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटत आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याची तयार केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटादरम्यान राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील नाथ बंगल्यावर एका अभियंत्याला नेऊन 10 ते 15 जणांनी मारहाण केली. या तरुणाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून तक्रारीत मारहाणीच्यावेळी जितेंद्र आव्हाड स्वत: उपस्थित होते असे म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना आरोपी म्हणून अनोळखी एक अशी फिर्याद नोंदवली आहे. तरी या प्रकरणात आरोपी म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नोंद करावी. तसेच या प्रकरणातील सुरक्षा दलातील उपस्थित पोलीस सुरक्षारक्षकांची तातडीने निलंबन करून चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

भाजपचे ठाणे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहून, तक्रारदार अनंत करमुसे यांच्या इमारतीचा परिसर, घोडबंदर रस्ता, मंत्री आव्हाड यांच्या घरा बाहेरचा परिसर आणि घराच्या आवारातील सीसीटिव्ही फुटेज मिळवून घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आव्हाड यांच्या बंगल्यावरील प्रकरण दिवसेंदिवस चिघळत असून भाजपने यावर आक्रमक पवित्रा घेतली आहे. तसेच पोलिसांवरही कारवाई करण्यासंबंधी दबाव वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जतेंद्र आव्हाड यांच्यासोबत बुधवारी बैठक झाली. यावेळी या प्रकरणावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आव्हाड यांच्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.