जाणून घ्या… वेगाने चालण्याचे ‘हे’ ५ मोठे फायदे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजच्या जीवनशैलीमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की एखाद्या व्यक्तीच्या चालण्याच्या वेगाचा त्याचे आयुर्मान वाढण्याशी संबंध आहे. इंग्लंडमधील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ रिसर्च (एनआयएचआर)’ आणि ‘लीसेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर’मधील संशोधकांनी याविषयी अहवाल सादर केला आहे. ज्यांना सर्वसाधारणपणे वेगाने चालण्याची सवय आहे, अशा व्यक्ती मंदगतीने चालणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त काळ जगू शकतात, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे. व्यक्तीचे वजन किंवा लठ्ठपणाचा निकष बाजूला ठेवत त्याच्या चालण्याच्या वेगावरून त्याचे आयुर्मान ठरविण्याबाबतचे हे पहिलेच संशोधन आहे. हा अभ्यास ‘मायो क्लिनिक प्रोसिडिंग्ज’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

चालणे आणि आयुर्मान यांचा परस्पर संबंध जाणून घेण्यासाठी ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ रिसर्च (एनआयएचआर)’ आणि ‘लीसेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर’ मधील संशोधकांनी चार लाख ७४ हजार ९१९ लोकांची माहिती तपासली आहे. त्यातून त्यांना असे निदर्शनास आले की, ज्यांना सर्वसाधारणपणे वेगाने चालण्याची सवय आहे, अशा व्यक्ती मंदगतीने चालणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत जास्त काळ जगू शकतात. एखाद्या व्यक्तीचे वजन कितीही असले तरी त्याच्या चालण्याच्या वेगाचा त्याचे आयुर्मान वाढण्याशी संबंध दिसून येतो. प्रमाणापेक्षा कमी वजन असलेल्या व्यक्ती, ज्या मंदगतीने चालतात, त्यांचे आयुर्मान सर्वात कमी असते. या प्रकारचे सरासरी आयुर्मान पुरुषांमध्ये ६४ वर्षे आठ महिने, तर महिलांमध्ये ७२ वर्षे चार महिने आढळले.

वेगाने चालण्याचे फायदे –

1) वेगाने चालण्याची सवय लावून घेतल्यास तुम्ही दीर्घायुष्यी होऊ शकता.

2) वेगाने चालण्याने विविध आजार होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात घटतो.

3) हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका वेगाने चालण्याने २४ टक्क्यांनी घटतो.

4) ६० वर्षांवरील वयस्कर लोकांनाही वेगाने चालणे हृदयविकार व तत्सम आजारांपासून संरक्षण मिळवण्यासाठी उपयुक्‍त ठरते.

5) नियमित चालण्यामुळे व्यक्तींची स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत होते.