CM उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आमदारांचं ‘ऐतिहासिक’ छायाचित्र, देवेंद्र फडणवीस ‘गैरहजर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज सकाळी दहाच्या सुमारास नागपूरच्या विधान भवनाच्या पायऱ्यावर चौदाव्या विधानसभेच्या सदस्यांनी एक संयुक्त ऐतिहासिक छायाचित्र घेतलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक आमदार यावेळी उपस्थित होते. यावेळी काही सदस्यांनीही उपस्थिती लावली होती. आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही आमदारांसह नागपूर येथील दीक्षाभूमीला भेट देऊन वंदन केलं. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा देत त्यांचं स्वागत केलं.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर छायाचित्र घेताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही भाजप आमदार गैरहजर असल्याचं दिसलं. यावेळी काही महिला आमदारांनी मागणी केली की, त्यांना समोरच्या रांगेत बसू द्यावं. परंतु ही मागणीही दुर्लक्षित केल्याचं दिसून आलं. त्यामुळे सदर महिला आमदारांना मागच्या रांगेत उभं राहत छायाचित्र काढावं लागलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/