आकरा वाळू माफियांकडून दौंडच्या पत्रकारास जबर मारहाण

बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दौंड – पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – शिर्सुफळ येथील तलावातून बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांची व्हिडीओ शूटिंग काढणाऱ्या पत्रकारास वाळू माफियांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत महेश बालदत्त आटोळे (रा. रावणगाव ता. दौंड) या पत्रकाराने फिर्याद दिली असून बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार आटोळे व त्यांचा मित्र हे शिर्सुफळ तलावामध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपश्याचे आपल्या कमेऱ्यामध्ये शूटिंग काढत होते. त्यावेळी तेथे अकरा वाळू माफियांनी येऊन त्यांच्याकडील दोन मोबाईल, कॅमेरा व खिशातील रक्कम घेऊन त्यांना लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण केली.

यावेळी पत्रकाराला पिस्तूलाचा धाक दाखवून, ‘त्यांचे पैसे परत देत असताना, आम्ही सहा महिन्यांपासून हफ्ता घेत आहोत’ असे शूटिंग घेतलेली असल्याचे सांगितले. बारामती पोलिसांनी याबाबत अकरा वाळू माफियांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.