‘कोरोना’मुळे कडकनाथला आला ‘भाव’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आढळणार्‍या कडकनाथ कोंबड्याची मागणी देशभरात वाढली आहे. लॉकडाऊन दरम्यान मागणी कमी झाली होती. मात्र, अनलॉकची अंमलबजावणी झाल्यानंतर कडकनाथ कोंबड्यांची मागणी सतत वाढत आहे. राजधानी दिल्लीत एक कोंबडा साधारण 850 रुपयांना विकला जात आहे.

मध्य प्रदेश सरकारच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कडकनाथ कोंबड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, पोल्ट्री फार्म मालकांच्या उत्पन्नात वाढ होण्याकरिता राज्य सरकारने उत्पादन आणि विक्री वाढविण्याची योजना तयार केली आहे. तसेच या जातीच्या कोंबड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी सहकारी शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. झाबुआ, अलिराजपूर, बडवानी आणि धार जिल्ह्यातील नोंदणीकृत कुक्कुटपालनांमध्ये एकूण कोंबड्यांचे पालन करणारे 300 सदस्य आहेत. झाबुआच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तोमर म्हणाले, देशभरातून कुक्कुटपालनांचे मालक कडकनाथ पिल्ले खरेदीसाठी येत आहेत. मात्र, कोरोनाविरूद्धच्या लढाईत या कोंबड्यांच्या वापरावरून कोणताही स्वतंत्र वैज्ञानिक अभ्यास केला गेला नाही. मात्र, हे निश्चितपणे आढळले आहे की, या विशिष्ट प्रकारच्या कोंबड्यांच्या मांसात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते आणि इतर कोंबड्यांच्या तुलनेत चरबी आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते.