आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी

कनोज: उत्तरप्रदेशमध्ये रविवारी सकाळी आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी आहेत. ही घटना कनोज जवळील सौरिख पोलीस स्टेशन क्षेत्रात घडली. बस ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ती बस कार ला जाऊन धडकली आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. यामुळे या अपघातात मोठी मानवहानी झाली आहे.

अपघातानंतर सर्व जखमींना जवळच्या सैफई मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथं जखमींवर उपचार चालू आहेत. अपघाताची भीषणता पाहून मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे.

अधिकची माहिती अशी की, अपघात झालेली बस दिल्लीवरून बिहारला जात होती. सौरिख क्षेत्रात ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हा अनर्थ झाला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे कानोजच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.