केजरीवालांची जीभ घसरली ; मनोज तिवारी बाबत ‘असा’ केला वादग्रस्त उल्लेख

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम आदमी पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या मुद्द्यावरून दिल्लीतील राजकारण सध्या तापले आहे. अशातच आता आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप नेते मनोज तिवारी यांच्या वडिलांना संबोधून वादग्रस्त वक्तव्य केल्याचे समोर आले आहे.

दिल्लीत एका सभेत केजरीवाल बोलत असताना उपस्थितांना ते संबोधित करत होते. यावेळी बोलताना केजरीवाल यांनी तिवारी यांच्या दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबतच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, “गुजरात, आंध्रप्रदेश, बिहार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यासाठी आंदोलने केली आहेत. या राज्यांना देखील कमकुवत करणार का ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यापासून रोखणारे मनोज तिवारी आहे तरी कोण ? दिल्ली राज्य मनोज तिवारींच्या बापाचे आहे काय ? दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी मनोज तिवारी यांच्या बापाने आंदोलन केले नाही” असं वादग्रस्त वक्तव्य केजरीवाल यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीला पूर्ण राज्याच दर्जा देण्याबाबत मनोज तिवारी यांनी आपलं मत मांडलं होतं. यावेळी बोलताना तिवारी म्हणाले होते की, ” दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येऊ नये, असे केल्यास देशातील संघराज्य पद्धतीला धोका निर्माण होईल.” मनोज तिवारी यांच्या याच वक्तव्याचा केजरीवाल यांनी समाचार घेतला आहे.

केजरीवालांकडून भाजपच्या घोषणापत्राचे दहण
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आयोजित जाहीर सभेत भाजपच्या 2014 मधील घोषणा पत्राची होळी केली. यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, “भाजपच्या 2014 च्या घोषणापत्रात दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील सात जागा जिंकल्यास दिल्लीला पूर्ण राज्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजप आणि मोदी यांनी दिल्लीकरांना फसवले आहे. मागील 70 वर्षांपासून दिल्लीतील लोकांचा अपमान करण्यात येत आहे. यापुढे हे सहन केले जाणार नाही.” असंही केजरीवाल म्हणाले.

You might also like