धक्कादायक ! ‘त्या’ कर्मचार्‍यानं पोलिस संरक्षणात चक्क गुटख्याची गाडी पोहचवली पुण्यात, कॉन्स्टेबल अटकेत

संगमनेर : पोलीसनामा ऑनलाइन –  संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीस असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गुटख्याची अवैध वाहतूक करण्याऱ्या वाहनाला मदत केली. तसेच अवैध गुटखा व्यवसायाला भांडवल पुरवले. कर्तव्य बजावत असताना गुटख्याच्या वाहनाला जुन्नर तालुक्यातील भोरवाडी पर्यंत संरक्षण देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला खोपोली पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी कवडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता शनिवार (दि.20) पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवडे हा पोलीस कर्मचारी गुटख्याच्या वाहनाला संरक्षण देऊन भोरवाडी येथे गेल्याचे समोर आले. पोलिसांना माहिती मिळताच कवडे याला भोरवाडी येथून ताब्यात घेऊन खोपली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्याला अटक केल्याची माहिती कोणालाच माहित नव्हती. त्यानंतर खोपील पोलीस ठाण्यातून पोलीस अधीक्षक कार्यालयाला गुटख्याच्या वाहनास संरक्षण दिल्या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यास अटक केल्याचे पत्राद्वारे कळवण्यात आले. हा प्रकार समोर येताच नगर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

शिवाजी कवडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. खोपोली पोलिसांच्या व्यतिरिक्त पारनेर आणि घारगाव येथे चौकशी करणे आवश्यक असल्याची चर्चा सध्या होत आहे. दरम्यान कर्तव्यात कसूर केलेल्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करणारे पोलीस अधिक्षक कवडेच्या बाबतीत काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.