Thane : कुत्र्याला ठार करून जाळल्यामुळं प्राणीप्रेमींमध्ये प्रचंड संताप

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – शेजा-यासोबत झालेल्या वादातून एका पाळीव कुत्र्याची हत्या करून त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील घोडबंदर येथील वाघबीळ भागात समोर आली आहे. पशुनाही लाजवले असे अमानवी कृत्य घडल्याने प्राणी मित्रांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.

विक्की उर्फ धीरज संतोष रेड्डी (वय 26) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील किंगकॉंंग नगर येथे राहणारे ललित मलिक हे आपल्या लहान भावाला घेऊन जात होते. त्यावेळी तेथे उभा असलेल्या गाडीवरील झेंड्याला चूकून हात लागल्याच्या कारणावरून विक्कीने हाताने चापट मारून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घराच्या बाहेर फिरणारा कुत्रा विक्कीवर भुंकला. त्याचा राग आल्याने कुत्र्यास मारून टाकत जाळून टाकत पूरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तसेच हातातील चाकूचा धाक दाखवत शेजारील रहिवाशांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विक्की हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्या विरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव दिल्याची माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.