KL राहुल T- 20 मध्ये ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ चा मान पटकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक बनला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय टी – 20 मालिकेमध्ये केएल राहुल याने प्रथमच भारताकडून विकेटकीपींग केली आणि त्याने आपल्या पहिल्या मालिकेमध्ये ऐतिहासीक कामगिरी केली आहे. विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटने न्युझीलंडच्या विरोधात होणाऱ्या मालिकेसाठी केएल राहुल याची विकेटकीपर म्हणून निवड केली. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाला सार्थ कामगिरी करत केएल राहुल याने प्लेअर ऑफ द सीरिज होण्याचा बहुमान मिळवला. अशी कामगिरी करणारा केएल राहुल हा पहिला भारतीय विकेटकीपर ठरला आहे.

धोनीला जे जमले नाही ते राहुलने करून दाखवले
महेंद्रसिंग धोनी हा भारताचा सर्वोत्कृष्ट विकेटकीपर आहे. मात्र, टी 20 मालिकेमध्ये विकेटकीपर म्हणून प्लेअर ऑफ द सीरीज हा किताब त्याला कधीच मिळाला नाही. मात्र, केएल राहुल याने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी 20 मालिकेत खेळताना हा किताब पटकावला आहे. हा किताब पटकावणारा केएल राहुल हा भारताचा पहिला विकेटकीपर ठरला आहे. तसेच न्यूझीलंडच्या भूमीवर हा किताब पटकावणारा पहिला खेळाडू देखील ठरला आहे.

विकेटकीपींग आणि बॅटींगमध्ये चमकदार कामगिरी
न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या या मालिकेमध्ये केएल राहुल याने विकेटकीपींग आणि बॅटींगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पाच सामन्यात त्याने 56 च्या सरासरीने 224 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश असून नाबाद 57 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. याशिवाय त्याने विकेटकीपिंगमध्येही आपला प्रभाव पाडला आहे. या मालिकेत त्याने तीन झेल आणि स्टंपींगसह एकूण चार बळी घेतले आहेत.