आंदोलनं अन् चळवळी उभारल्या गेल्या, ‘एकदम फ्री’मध्ये नाही मिळाली देशाला रविवारची साप्ताहिक सुट्टी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : एक वेळ असा होता जेव्हा आठवडा सोमवारपासून सुरू होत नव्हता आणि रविवारी संपतही नव्हता! होय, आपण आठवड्याची सुरुवात किंवा शेवट कुठूनही करू शकत होता, कारण कामगार आणि कष्टकरी लोकांना दररोज काम करावे लागत असे. आठवड्याची कुठलीही सुट्टी नव्हती. सद्य परिस्थितीत, रविवारची सुट्टी आठवड्यातील सर्वात सामान्य गोष्ट आहे, बर्‍याच ठिकाणी तर आता कामाचे दिवस हे पाचच उरले आहेत. कधी आपण हा विचार केला आहे का, की भारतात रविवारी सुट्टी कधीपासून आणि का सुरू झाली?

या सुट्टीच्या मागे किती मोठा संघर्ष झाला आणि कोणत्या व्यक्तीमुळे हे शक्य झाले असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ब्रिटिश काळातील 130 वर्ष जुनी कहाणी आपल्याला यासाठी माहित असणे आवश्यक आहे कारण रविवारची सुट्टी विश्रांतीसाठी, मौज-मजा करण्यासाठी किंवा चित्रपट पाहण्यासाठी सुरू करण्यात आलेली नव्हती, तर भारताच्या कामगार क्रांतीचा हा एक महत्त्वाचा अध्याय होता.

ब्रिटिश राजवटीत प्रत्येक दिवस हा एक कामाचा दिवस होता

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या वर्चस्वाआधी कृषिप्रधान देश भारतात बहुतेक शेतकरी आणि शेतमजूर हे काम करत असायचे. नियमित किंवा साप्ताहिक सुट्टी असा कोणताही प्रकार नव्हता, आपल्या आवश्यकतेनुसार सुट्टी मिळत होती. जेव्हा ब्रिटीशांनी मिल व कारखाने स्थापन केले तेव्हा त्यांनी भारतीय गोरगरीबांचे शोषण केले. ही प्रणाली लवकरच इतकी क्रूर झाली की लोकांकडून कोणत्याही नियम व कायद्यांशिवाय रक्त शोषण्याच्या पलीकडे जाऊन काम करून घेतले जात आहे.

मग कामगारांसाठी दोन शिफ्टची व्यवस्था सुरू झाली. कामाच्या दरम्यान कामगारांना जेवण्यासाठी आणि अगदी शौचसाठी देखील वेळ दिला जात नव्हता. दुसरीकडे, भारतात चर्च स्थापन करण्यात आले होते आणि सर्व ख्रिश्चन म्हणजेच इंग्रज लोक रविवारी प्रार्थनेसाठी चर्चला जात असत आणि त्यांचा अर्धा दिवस फुरसतीत घालवला जात असे. परंतु अर्ध्या-मिनिटाची रजा सुद्धा गरीब कामगारांना मिळत नसे. म्हातारे, मुले आणि गर्भवती महिला पर्यंत सर्वांना काठीने मारहाण केली जायची.

नारायण मेघाजी लोखंडे यांनी या मोहिमेला सुरुवात केली

बॉम्बे टेक्सटाईल मिलमध्ये स्टोअर कीपर म्हणून तैनात असलेले लोखंडे यांना कामगारांची वेदना अतिशय जवळून जाणवली. कामगारांना कोणतीही सुविधा नव्हती, रजा, आरोग्य, पगार, अन्नासारख्या मूलभूत मानवी हक्कांची कामगारांना तरतूद होत नव्हती. 1880 मध्ये इंग्रजांपर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडे यांनी प्रथम ‘दीन बंधू’ नावाचे वृत्तपत्र काढले आणि कामगारांच्या समस्या व हक्कांबद्दल लिहिले.

लोखंडे यांनी ‘बॉम्बे हँड्स असोसिएशन’च्या माध्यमातून 1881 मध्ये प्रथमच कारखान्याशी संबंधित कायद्यात बदल करण्याची मागणी केली. जेव्हा त्यांच्या मागण्या पूर्णपणे नाकारल्या गेल्या तेव्हा संघर्ष सुरू झाला. 1884 मध्ये लोखंडे या संघटनेचे प्रमुख देखील झाले आणि कामगारांच्या हक्कांसाठी संघर्षाला वेग आला. श्रमिक सभेत साप्ताहिक रजेची मागणी उठविल्यानंतर कामगारांच्या मागण्यांचा एक पूर्ण ठराव तयार करण्यात आला. या सर्व मागण्यांचा यात समावेश होता.

– कामगारांना रविवारी सुट्टी असावी.
– जेवण करण्यासाठी कामादरम्यान वेळ मिळावा.
– कामाचे तास, म्हणजे शिफ्टची एक वेळ निश्चित करणे.
– कामावर अपघात झाल्यास कामगारांना पगारासह सुट्टी मिळावी.
– एखाद्या अपघातात कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या अवलंबितांना पेन्शन मिळावी.

साडेपाच हजाराहून अधिक कामगारांनी या मागणी पत्रावर सही केली असता गिरणी मालक आणि ब्रिटीश सरकारने ही चळवळ चिरडण्याचा निर्णय घेतला. कामगारांवर कठोर छळ करण्यात आला, अगदी मुलांनाही सोडले नाही. ब्रिटिश सरकारचा छळ जसजसा वाढत गेला तसतसे लोखंडे यांची चळवळ अधिकच वाढली आणि केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पसरली.

1890 चा तो अविस्मरणीय दिवस

ही चळवळ इतकी मोठी झाली होती की लोखंडे यांच्या श्रमिक सभेमध्ये देशातील सुमारे 10 हजार कामगार मुंबईतील रेसकोर्स मैदानावर जमले आणि मिलच्या कामावर बंदी घालण्याची घोषणा केली. तेव्हा कुठे ब्रिटीश राजवटीचा अहंकार कमी झाला आणि 10 जून 1890 रोजी ‘रविवार’ हा दिवस कामगारांना साप्ताहिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला. इतकेच नाही तर कामाचे तासही ठरवले आणि जेवणाची वेळ वगैरेसुद्धा मंजूर झाली, ज्यास नंतर लंच ब्रेक म्हणून मान्यता मिळाली.

रविवारी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये हजेरी लावण्यासंदर्भात पाश्चात्य देशांमध्ये साप्ताहिक सुट्टी होती, परंतु भारतातील इतिहास हा कामगार क्रांतीचा आहे. त्यावेळी भारतातील रविवारीची सुट्टी करमणुकीसाठी नसून आरोग्याची काळजी घेण्यासाठी, सामाजिक आणि देशाच्या कामासाठी वेळ देण्यासाठी मागण्यात आली होती आणि दीर्घ लढाईनंतर लोखंडे यांच्या नेतृत्वात हे साध्य केले गेले.

नारायण मेघाजी लोखंडे कोण होते?

2005 मध्ये जेव्हा भारत सरकारने लोखंडे यांच्या फोटो आणि नावासह टपाल तिकीट जारी केले तेव्हा कामगार नेते म्हणून चर्चेत आलेल्या लोखंडे यांच्याविषयी फारसे माहिती नव्हते. 1848 मध्ये पुणे जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता आणि फुले यांचे सक्रिय कार्यकर्ते ते बनले होते.

मॅट्रिकनंतर लोखंडे यांनी प्रथम रेल्वेच्या टपाल विभागात काम केले आणि त्यानंतर ते बॉम्बे टेक्सटाईल मिलमध्ये पोहोचले. येथून त्यांनी सक्रियपणे मजदूर संघटना आणि चळवळींमध्ये भाग घेतला आणि त्यानंतर त्यांचे नेतृत्व देखील केले. भारतातील कामगार क्रांतीचे जनक लोखंडे यांनी कामगाराच्या हक्कांसाठी जी चळवळ उभी केली होती त्यात फुले यांचाही सहभाग होता आणि ते सभेत कामगारांना संबोधित देखील करायचे.