युद्धातील मृतांचा आकडा कोण आणि कसा मोजतात ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला करत जैशचे मोठे नुकसान केले. यामध्ये 350 दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु कोणतीही अधिकृत घोषणा याबाबत झाली नव्हती.

दरम्यान यानंतर या पार्श्वभूमीवर हवाई दलाकडून पत्रकार परिषद घेऊन सोमवारी (4 मार्च) प्रथमच अधिकृतपणे सांगितले. यावेळी भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनुआ यांनी या आकडेवारीवर भाष्य केले. धनुआ म्हणाले, “आम्ही फक्त आमचं टार्गेट साधतो. त्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले किती, जीवितहानी झाली, हे मोजणे आमचं काम नाही, ते सरकार पाहील.”

अनेकांना हा प्रश्न पडतो की, जेव्हा अशी हल्ल्याची कारवाई केली जाते किंवा कोणतेही युद्ध जेव्हा होते तेव्हा त्यातील मृतांची आकडेवारी कशी मोजली जाते. याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत की, याची नेमकी प्रक्रिया काय आहे आणि यातील आकडेवारी नेमकी कोण मोजतं याची आपण माहिती घेणार आहोत. याशिवाय ही आकडेवारी मोजत असताना कोणत्या समस्या येतात हे ही आपण जाणून घेणार आहोत.

युद्धातील मृतांचा आकडा कोण मोजतं ?

जेव्हा दोन देशांमध्ये युद्ध होतं तेव्हा त्यात मृतांचा आकडा हा कोणताच देश किंवा संघटना मोजत नाही. युद्धामध्ये मृतांचा आकडा मोजण्याचे काम स्थानिक प्रशासनावर असतं. तिथलं सरकार जो आकडा निश्चित करते तोच आकडा स्थानिक प्रशासनातर्फे जाहीर केला जातो. याशिवाय जर दोनपेक्षा जास्त देशांमध्ये युद्ध झाले असेल तर, त्यातील मृतांचा आकडा संयुक्त राष्ट्र जाहीर करत असतं. परंतु ही सख्यादेखील अंदाजावरच आधारीत असते.

युद्धातील मृतांचा आकडा कसा मोजला जातो ?

युद्धातील मृतांचा आकडा मोजण्यासाठी दोन पद्धतींचा वापर केला जातो. अ‍ॅक्टिव्ह आणि पॅसिव्ह सर्व्हिलान्स अशा प्रकारे दोन पद्धती वापरल्या जातात. त्यातील पहिली पद्धत म्हणजेच अ‍ॅक्टिव्ह सर्व्हिलान्स पद्धतीमध्ये मृतदेहांची मोजणी केली जाते किंवा युद्धाची झळ बसलेल्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. नमूना सर्वेक्षणाचा आधार घेऊन मृतांचा आकडा निश्चित केला जातो.

तर दुसरी पद्धत म्हणजेच पॅसिव्ह सर्व्हिलान्स. यात माध्यमे, रुग्णालये, शवागरे, सुरक्षा दले आणि तटस्थ संस्थांद्वारे गोळा केलेल्या माहितीवरून मृतांचा आकडा निश्चित केला जातो. यातून जी आकडेवारी समोर येते ती अनेकदा खऱ्या आकड्याजवळ जाणारी अशी असते असेही सांगितले जाते.

युद्धातील मृतांचा आकडा निश्चित करताना येतात ‘या’ समस्या

युद्धातील मृतांची आकडेवारी निश्चित करण्यासाठी माहिती देणारा कोण आहे यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. बऱ्याचदा पराभूत देशांकडून मृतांची आकडेवारी कमी दाखवली जाते. कारण शत्रू देश आपल्यावर भारी पडला असा संदेश यातून दिला जातो. ज्याप्रमाणे पराभूत देशांकडून आकडेवारी कमी दाखवली जाते त्याच प्रमाणे हल्ला करणाऱ्या देशांकडून मृतांचा आकडा वाढवून सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे युद्धातील मृतांचा आकडा खरा कोणाचा मानायचा याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो हेही तितकेच खरे आहे.