दारूचे व्यसन असणार्‍यांसाठी सॅनिटायजर धोकादायक, जाणून घ्या काय होऊ शकतो त्रास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दारूचे व्यसन असणार्‍या लोकांसाठी सॅनिटायजरचा जास्त वापर करणे धोकादायक ठरू शकते. भारतीय डॉक्टरांना अभ्यासात आढळले की, सॅनिटायजरच्या जास्त वापराने अशा लोकांना श्वास घेण्याचा त्रास होतो. काही प्रकरणांमध्ये रूग्णांना अत्यावस्थ झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. अल्कोहल आणि अल्कोहलिज्म जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

मुंबईतील लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेजचे डॉ. अवनीश डिसूजा यांनी शोधनिबंधात सांगितले आहे की, जास्त दारू पिण्याची सवय असणारे लोक हे व्यसन सोडण्यासाठी अनेक प्रकारची औषधे वापरतात. अशी औषधे घेणार्‍या लोकांच्या शरीरात सॅनिटायजर नकारात्मक परिणाम करते, कारण यामध्ये 70 टक्के अल्कोहल असते.

असेच एक औषध डायसल्फिरॅम घेणार्‍या लोकांमध्ये सॅनिटायजरची विपरीत प्रतिक्रिया दिसून येते. हे औषध घेतल्यानंतर जर अल्कोहलची थोडीजरी मात्रा घेतली गेली तर उल्टी, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो, यामुळे अशा लोकांना अल्कोहाल युक्त औषधांपासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.

सॅनिटायजर लावल्याने श्वासाला त्रास
सॅनिटायजरमध्ये 70 टक्के अल्कोहल असते, ज्यामुळे डायसल्फिरॅम औषध घेत असलेल्यांना डोकेदुखी, उल्टी, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास त्रास होणे, आदी लक्षणे दिसतात.

सॅनिटायजरसाठी दारू सोडा
डॉ. डिसूजा यांनी शोधामध्ये एका रूग्णाचे उदाहरण दिले आहे की, हा रूग्ण श्वासाचा त्रास होत असल्याने रूग्णालयात आणला गेला. त्याच्यात हँगओवरसारखी लक्षणे सुद्धा होती. सॅनिटायजर लावून बँकेत जात असताना त्याची प्रकृती बिघडली होती. मेडिकल हिस्ट्रीतून समजले की, रूग्ण तीन वर्षापासून डायसल्फिरॅम औषध घेत होता. रूग्णाला सल्ला देण्यात आला की, कोरोनामुळे सॅनिटायजरचा वापर करण्यासाठी काही दिवसांसाठी औषध घेणे बंद करा आणि दारू पिऊ नये.