कोल्हापूरातील महापूराचा मुंबईला ‘फटका’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूरामुळे पुणे -बंगलुरु महामार्ग गेल्या तीन दिवस बंद पडला आहे. त्यामुळे कोल्हापूरातून गोकुळ, वारणासह अनेक दुधसंस्थांचे दुध नवी मुंबई, मुंबईला न पोहचल्याने मुंबईकरांना दुधाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

कोल्हापूर, सांगलीतून मुंबईला दररोज साधारण १२ ते १३ लाख लिटर दुध पुरवठा केला जातो. नवी मुंबईमध्ये या दुध संस्थांचे प्लँट असून हे दुध तेथे येते व तेथून ते पिशवीबंद करण्यात येऊन ते नवी मुंबई व मुंबईला पुरविले जाते. गोकुळ डेअरीचे साडेपाच लाख लिटर दुधाचे टँकर महामार्गावर अडकले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील प्लाँटमध्ये दुधाचा थेंबही राहिलेला नाही. त्यामुळे दुधाचा पुरवठा बंद झाला आहे.
मुंबई गुजरात, नाशिकमधून काही प्रमाणात दुधाचा पुरवठा झाला असला तरी १२ ते १३ लाख लिटर दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

गोकुळ दुधसंघाकडे १० लाख लिटर दुध शिल्लक असले तरी कोल्हापूर तसेच कोकणात जाणारे सर्व रस्ते बंद असल्याने या दुधाचे वितरण करणे शक्य झालेले नाही. त्याचबरोबर गावागावातून होणारे दुध संकलन ठप्प झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त