‘कोरोना’मुळे मृत्यू, रुग्णवाहिका मिळाली नाही, 2 दिवस मृतदेह ठेवावा लागला आईस्क्रीम ‘फ्रीजर’मध्ये

कोलकाता : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांचा आकडाही वाढत आहे. अशातच राजधानी कोलकाता येथे एका वृद्ध रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत व्यक्तीला दफन करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याने कुटुंबीयांना नाईलाजास्तव मृतदेह आइस्क्रिमच्या फ्रीजरमध्ये ठेवावा लागला. या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट मंगळवारी आला, त्यामध्ये मृत व्यक्तीला कोरोना झाल्याची पुष्टी झाली.

आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील राजा राममोहनराय सरानी परिसरातील 71 व्यक्तीचा श्वसनाच्या त्रासामुळे राहत्या घरामध्ये सोमवारी मृत्यू झाला. ज्या डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले होते, त्या डॉक्टरांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्या व्यक्तीची कोरोना तपासणी करण्यात आली.

कुटुंबातील सदस्याने सांगितले की, घरी आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आणि दुपारी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्याच्या माहितीनुसार, या घटनेची माहिती डॉक्टरांना दिल्यानंतर डॉक्टर पीपीई किट घालून घरी आले. मात्र, त्यांनी कोविड 19 चे प्रकरण असल्याने सांगत त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र दिले नाही. तसेच डॉक्टरांनी अहमर्स्ट स्ट्रीट पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.

शवगृहाकडून ही मदत मिळाली नाही
कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांकडे संपर्क साधला असता पोलिसांनी स्थानिक नगरसेवकाशी संपर्क साधण्यास सांगितले. कुटुंबातील सदस्याने सांगितले की, आम्हाला या ठिकाणी कोणतीच मदत मिळाली नाही तसेच राज्याच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. कुटुंबातील सदस्याने आरोग्य विभागाच्या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला पण कुणीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी शहरातील बऱ्याच शवगृहांशी संपर्क साधून मदत मागितली पण शवगृहांकडून देखील कोणतीच मदत मिळाली नाही.

शवगृहांकडून मदत मिळाली नसल्याने कुटुंबियांनी अंत्यसंस्कार होईपर्यंत मृतदेह ठेवण्यासाठी आइस्क्रिम फ्रीजरची व्यवस्था केली. या वृद्ध व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी आल्यावर आरोग्य विभागाने कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यावेळी आरोग्य विभागाला घडलेला सर्व प्रकार सांगण्यात आला. त्यानंतर महापालिकेचे लोक आले आणि त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.