कोरेगाव भीमा चौकशी आयोग : ‘शरद पवार हाजिर हो’ !, 4 एप्रिलला उपस्थित राहण्याचा आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरेगाव भीमा दंगलीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आयोगापुढे साक्ष देण्यास उपस्थित राहण्याची नोटीस पाठविली आहे.

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने गेल्या काही दिवसांपासून साक्षीपुरावा नोंदविण्याचे काम थांबविले आहे. हे काम मुंबईतील कार्यालयात ३० मार्चपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. आयोगाने कोणा कोणाच्या साक्षी नोंदविण्यात येणार आहे, याची यादी मंगळवारी जाहीर केली. त्यात ४ एप्रिल रोजी शरद पवार यांना साक्षीसाठी बोलाविले आहे. कोणत्याही परिस्थितीत यामध्ये बदल होणार नाही अथवा त्याची पुढील तारीख देण्यात येणार नाही, असे या नोटीसीमध्ये सुचित करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा दंगलीच्या अनुषंगाने पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेतील भाषणामुळे कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात शहरी नक्षलवादी असलेल्या अनेक नामवंतांना बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरुन अटक केली आहे. त्याविरोधात शरद पवार यांनी चौकशीची मागणी केल्यावर केंद्र सरकारने हा एल्गार परिषदेचा गुन्हा एनआयएकडे वर्ग केला आहे. त्यावरुन राज्यात मोठे राजकारण झाले आहे. त्यामुळे शरद पवार यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे साक्ष झाली तर ते नेमके काय सांगतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.