कामगार मंत्र्यांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केला : शिवसेना नेते अभय साळुंखे

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – स्वच्छ आणि बिन आरोपाचे सरकार चालवण्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. मात्र याला गालबोट लागताना दिसून येत आहे. राज्याचे कामगारमंत्री आणि लातूर चे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर कामगार कल्याण निधीतून दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये अपहार केल्याचा आरोप शिवसेनेचे लातूर सह संपर्क प्रमुख अभय साळुंके यांनी केला आहे. साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी केली आहे.

लातूर शहरामध्ये शिवसेनेचे अभय साळुंके यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन पालक मंत्री तथा महाराष्ट्राचे कामगार मंत्री यांच्यावर ३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

हेही वाचा -कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर कामगारांच्या नावाखाली आपल्या कार्यकर्त्यांना लाभ पोहचवत असल्यानं खळबळ !

साळुंखे म्हणाले, निलेंगकर यांनी कामगार विभागातर्फे कामगारांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये भ्रष्टाचार केला आहे. तसेच ५० हजार कामगारांची नोंदणी करुन तीन हजार कोटींचा घोटाळा केला आहे, असे साळुंखे म्हणाले. राज्यात सर्वात जास्त कामगार मुंबईत आहेत. तर, त्यापेक्षा जास्त कामगारांची नोंद निलंगा तालुक्यात कशी झाली ? असा प्रश्नही यावेळी साळुंखे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, संभाजी पाटील निलंगेकर आपल्या कार्यकर्त्यांना कामगारांच्या नावाखाली लाभ पोहचवत असल्यानं खळबळ उडाल्याचा प्रकार पोलीसनामाने समोर आणला होता. त्यातच आता निलंगेकरांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.