जी. एस. लक्ष्मी बनल्या पहिल्या महिला सामनाधिकारी

क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच सामनाधिकारी म्हणून महिलेची नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या जी.एस. लक्ष्मी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पहिल्या महिला सामनाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून त्या काम करू शकतात. क्रिकेटच्या इतिहासात महिलेची सामनाधिकारी म्हणून नियुक्ती होणं असं पहिल्यांदाच घडतं आहे. हा बहुमान भारतीय क्रिकेटरला मिळत आहे हे विशेष. क्लेअर पोलोसॅक यांनी पुरुषांच्या वनडे सामन्यात पंच म्हणून काम करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून मान मिळविला होता. त्यानंतर लक्ष्मी यांनी ही झेप घेतली आहे.

५१ वर्षीय लक्ष्मी यांनी २००८-०९मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले होते. आता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सामनाधिकारी म्हणून काम करता येणार आहे. त्यांनी या नव्या जबाबदारीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. याबरोबरच जी.एस. लक्ष्मी यांनी महिलांच्या तीन एकदिवसीय आणि तीन टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

हा सन्मान मिळाल्यानंतर जी. एस. लक्ष्मी म्हणाल्या की, ‘आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये माझा समावेश होणं हि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी भारतीय क्रिकेटर सोबतच सामनाधिकारी म्हणून बराच वेळ काम केलं आहे. याच अनुभवाच्या जोरावर मी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील चांगली कामगिरी करेल. मी या सन्मानासाठी आयसीसी, बीसीसीआय, माझे वरिष्ठ,परिवार आणि माझे सहकारी मित्र या सर्वांना धन्यवाद देऊ इच्छिते.