छपरा : ‘लालू प्रसाद यादव’ पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात, सारणमधून भरला उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लालू प्रसाद यादव यांनी छपरा जिल्ह्यातील सारण शिक्षक मतदार संघातून विधानपरिषदेच्या उमेदवारी अर्ज दाखल केला. या लालू प्रसाद यादव यांना 2001 पासून सतत पंचायत स्तरावरील अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या वर्षीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत सारण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अद्याप ते जिंकलेले नाही, परंतु त्यांचा विश्वास कमी झालेला नाही. यावेळी ते पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत.

आश्चर्यचकित होऊ नका की, लालू प्रसाद यादव रांचीच्या भगवान बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत, मग ते अर्ज कसा करू शकतात. हे ते लालू प्रसाद यादव नाहीत, जे राजद सुप्रीमो आहेत. हे केवळ सारणमधील मढौरा विधानसभा मतदारसंघातील रहिवासी असून, त्यांचे नाव फक्त लालू प्रसाद यादव आहे.

लालूंच्या नावाचा ते चांगला फायदा घेतात. 2001 पासून, ते सतत निवडणुकांच्या प्रत्येक स्तरावर अर्ज दाखल करतात. मग ते पंचायत पातळीवर असो, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा असो की राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका, आपले नशीब सर्वत्र आजमावून पाहतात. मात्र आजपर्यंत विजयाची चव कोणत्याही निवडणुकीत चाखली नाही, पण आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद नावामुळे आणि त्यांच्याच मतदारसंघातील असल्याने मीडियाच्या ठळक बातम्यांत नाव कमवतात. त्यांना विश्वास आहे की, ज्या दिवशी लोक त्यांना समजून घेतील, त्या दिवशी नक्कीच संधी देतील.

दरम्यान, सारण शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या विषयावर ते म्हणाले की, सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. त्या शिक्षकांच्या मागणीवरुन आम्ही निवडणुकीच्या मैदानात आहोत. केवळ आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे, नक्कीच यश मिळेल. सारण शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांनी प्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर, इतर लोक दिवसभर नावनोंदणीसाठी आले.