लासलगावात पेटवण्यात आलेल्या महिलेची प्रकृती ‘गंभीर’ बनल्यानं मुंबईला हलवलं

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिक जिल्ह्यातील लासलगावमध्ये एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली असून ही घटना लासलगाव बसस्थानकावर निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे शनिवारी (१५ फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेत पीडित महिला ६७ टक्के भाजलेल्या अवस्थेत आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान पीडित महिलेस उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती अशी की, एका विवाहित महिलेस लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव येथे चार जणांनी पेट्रोल टाकून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे महिला मोठ्या प्रमाणात भाजली गेली, त्यामुळे तिला तातडीने नजीकच्याच लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महिला ही मोठ्या प्रमाणात जळालेली असल्याने तिला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु महिलेची प्रकृती प्रचंड गंभीर असल्याने मुंबईतील मसीना रुग्णालयात हलविण्यात आले असून पीडितेवर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान या निंदनीय घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, चौकशीनंतर जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच त्यांनी पीडितेला धीर देत ‘तुम्ही लवकर बरे व्हा, कुठल्याही प्रकारची चिंता मनात बाळगू नका, डॉक्टरांकडून सर्वोतोपरी उपचार केले जात आहे, तुम्ही लवकर बरे व्हाल’ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या घटनेची माहिती त्यांच्या कानावर पडताच उद्धव ठाकरे रात्री साडे दहाच्या सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात पोहचले आणि गंभीररित्या भाजलेल्या महिलेची जळीत कक्षात जाऊन त्यांनी पाहणी केली आणि झालेल्या घटनेची विचारपूस केली. तसेच दोषींना कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले.

You might also like